दरवर्षी गुढी उभारतो, पण एक प्रश्न कधी विचारला का? गुढीपाडव्याची सकाळ, घरोघरी गुढी उभारली जाते. बांबूची काठी, कडुलिंबाची फांदी, साखरेच्या गाठी, फुलांचे हार, पिवळे किंवा केशरी रेशमी वस्त्र (Gudhi Padwa Cloth Tradition) आणि तांब्याचा कलश. आणि उभारल्यावर वाऱ्यावर फडफडणारे वस्त्र दृष्टीत पडते. ही साडी आपण दरवर्षी बांधतो. आई-आजी कडून आलेली ही परंपरा आपण जिवंत ठेवून आहोत.
कधीतरी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसावे की गुढीसाठी साडीच का असते ? कोणते रंग? आणि यामागे नक्की कारण काय आहे?
तर वाचूया त्या एका वस्त्राची संपूर्ण गोष्ट.

गुढी म्हणजे काय?
‘गुढी’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘विजयध्वज’. हा विजयध्वज महाराष्ट्रात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला (Gudhi Padwa), घरोघरी उभारला जातो. या परंपरेमागे एक नाही, अनेक आख्यायिका आहेत.
पहिली आख्यायिका — प्रभू श्रीराम रावणाच्या वधानंतर विजयी होऊन अयोध्येला परतले. त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील प्रत्येक घरावर विजयध्वज उभारण्यात आला. तो दिवस होता, चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणजेच गुढीपाडवा.
दुसरी आख्यायिका — शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवला. त्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली. त्याच दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली, जी दिनदर्शिका आजही महाराष्ट्रात वापरली जाते.
तिसरी आख्यायिका — छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक विजयानंतर गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली, ही परंपरा आपल्या प्रजेला विजयाचा संदेश देण्यासाठी सुरू झाली.
आणि सर्वात प्राचीन मान्यता — ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. काळाची, दिवसांची, महिन्यांची, वर्षांची मोजणी सुरू केली. म्हणून गुढीपाडवा हा केवळ महाराष्ट्राचे नवे वर्ष नाही, ते या मान्यतेनुसार सृष्टीचे नवे वर्ष आहे.
गुढीवर साडी का?
हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे. गुढी (Cloth Tradition) ही केवळ एक काठी नाही. ती शक्तीचं प्रतीक आहे. देवीचं प्रतीक आहे. गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात आणि ती उभारताना शिव-शक्ती तत्त्वाचं आवाहन केलं जातं. देवीला वस्त्र नेसवण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत अत्यंत प्राचीन आहे. मंदिरात देवींना साडी नेसवली जाते. त्याच भावनेने, गुढीला, जे शक्तीचं प्रतीक आहे म्हणून साडी बांधली जाते ज्यामुळे घरात समृद्धी येते असा विचार आहे.
गुढीवरचं वस्त्र म्हणजे केवळ सजावट नाही. ते देवीला अर्पण केलेलं वस्त्र आहे आणि म्हणूनच ते वस्त्र नवीन असावं, स्वच्छ असावं, शुभ रंगाचं असावं, असं मानलं जातं.
कोणती साडी? कोणता रंग? का?
खण साडी — सर्वोत्तम
महाराष्ट्रात खण साडी ही सर्वात पवित्र साडी मानली जाते. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, महाराष्ट्रातल्या सर्व शक्तिपीठांमध्ये देवींना खण साडी नेसवली जाते. (Cloth Tradition)
जी साडी देवीला नेसवतात, तीच साडी गुढीला बांधण्याची परंपरा किती अर्थपूर्ण आहे हे यातून समजते.
रेशमी वस्त्र — दुसरा उत्तम पर्याय
रेशीम हे हिंदू संस्कृतीत शुद्ध आणि पवित्र मानलं जातं. देवपूजेत, यज्ञात, संस्कारांमध्ये रेशमाला विशेष स्थान आहे. रेशमावर नकारात्मक ऊर्जा टिकत नाही असं मानलं जातं, म्हणूनच गुढीवर रेशमी साडी किंवा रेशमी वस्त्र बांधणं शुभ मानलं जातं. चमकदार रेशीम उन्हात लखलखतं आणि ती गुढी दुरूनही दिसते. सौंदर्याने आणि आध्यात्मिकतेने, दोन्ही बाजूंनी रेशीम योग्य मानलं जातं.
काठपदर साडी — तिसरा पर्याय
जर घरात खण नसेल, रेशीम नसेल तर सोनेरी किंवा जरीचा काठ असलेली साडी गुढीला बांधता येते. काठ जड असू नये कारण वाऱ्यावर फडकणाऱ्या गुढीला हलकं वस्त्र जास्त शोभतं.
रंग — लाल, केशरी, पिवळा, हिरवा
लाल — शक्तीचं, विजयाचं, शुभाचं प्रतीक. देवीचा प्रिय रंग.
केशरी — शौर्याचं, तेजाचं, वीरतेचं प्रतीक. मराठा परंपरेतला पवित्र रंग.
पिवळा — समृद्धीचं, ज्ञानाचं, आनंदाचं प्रतीक.
हिरवा — नव्या सुरुवातीचं, धरणीमातेचं, नव्या पिकाच्या नव्या चैत्र पालवीचं प्रतीक. शेतकरी कुटुंबांमध्ये गुढीवर हिरवं कापड बांधण्याची परंपरा आहे, नवीन पेरणीच्या हंगामाचं स्वागत म्हणून.

वस्त्र नवीन का असावं?
गुढीवरचं वस्त्र नवीन किंवा स्वच्छ धुतलेलं असणं आवश्यक आहे, आणि त्याचं कारण अगदी साधं आहे. गुढी ही देवी-देवतेला अर्पण होत असते, देवाला कधीही वापरलेलं, जीर्ण झालेलं वस्त्र अर्पण करत नाहीत. नवं वस्त्र म्हणजे, आदर, सन्मान. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी, नव्या वस्त्राने गुढी सजवणं म्हणजे, नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करणं असं आहे.
गुढी फक्त सण नाही, संस्कार आहे
गुढीपाडव्याला गुढी उभारणं म्हणजे फक्त एक ritual नाही. तो विचार आपण वर्षभर जगलो पाहिजे. गुढी मध्ये वापरलेल्या बांबू मध्ये उंच सशक्त राहण्याचा संदेश आहे. त्या तांब्याच्या कलशात आहे समृद्धीची कामना आहे. त्या कडुलिंबाच्या पानांत कडवट अनुभव स्वीकारण्याची शिकवण आहे. त्या साखरेच्या माळेत आहे जगण्यातला गोडवा अनुभवण्याचा विचार आहे आणि त्या साडीत आहे विजयी ध्वजाची संकल्पना आहे. हे सर्व मिळून येणाऱ्या नव्या वर्षाचे उमेदीने स्वागत आपण करत असतो.
यावर्षी गुढीवर साडी बांधताना, आता ती साडी वेगळ्या नजरेने बघाल. ते फक्त वस्त्र नाही, ती महाराष्ट्राच्या शतकानुशतकांच्या परंपरेचा एक अविभाज्य इतिहास आहे. (Gudhi Padwa Cloth Tradition)
शुभेच्छा. 🧡
📱 Instagram: @brandmarathasocial 🎥 YouTube: Brand Maratha 🔗 Store: brandmaratha.store







Comments (2)
[…] “गुढीवर साडी का बांधतात” → 👉🏾 Gudhi Sadi Tradition […]
[…] “गुढीवर साडी का बांधतात” → Gudhi Saree Tradition […]